पालकत्वात दडलयं देशाचं भविष्य 

उद्याचं भविष्य ज्यांच्या हाती आहे ते म्हणजे पालक. उद्याचा नागरिक घडवणारा कारागीर म्हणजे पालक असे म्हणायला हरकत नाही. आजचं मूल म्हणजे उद्याचा नागरिक त्याला घडवायचं की बिघडवायचं हे पालकांच्या हातात असतं.

      पालक म्हणजे नेमकं कोण ? पालक ही संकल्पना व्यापक आहे. मुलांचे पालन पोषण करणारी व्यक्ती म्हणजे पालक. मुलाचं संगोपन करणारी व्यक्ती म्हणजे पालक.

       मुलांचं संगोपन करण्याची प्रक्रिया म्हणजे “पालकत्व “. पालकत्वामध्ये मुलाला खाऊ घालणे . त्याची काळजी घेणे तसेच नकळत आपल्या वागण्यातून त्यावर संस्कार करणे तसेच काही नियोजित संस्कार करणे अशा अनेकानेक बाबी अंतर्भूत आहेत.

        पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं .संयुक्त कुटुंबातील आजी -आजोबा, आत्या- काका , आई- वडिल हे सर्व पालक या व्याख्येत बसतात व त्यांचा मुलाच्या विकासातील सहभाग म्हणजे पालकत्व.

    पालकत्व केवळ आई-वडिलांपूरतच सिमीत नसून त्याची व्याप्ती कुटुंब प्रकारानुसार ठरते. विभक्त कुटुंबात आईवडिल दोघंही नोकरी करणारे असतील व आई नोकरी करते म्हणून दिवसभर मूलं सांभाळण्याची जबाबदारी आजी आजोबा कडे असते. अशावेळी त्या मुलाचे  आईवडिल आजी आजोबा हे पालक म्हणून जबाबदारी पार पाडतात.

      ज्या कुटुंबात आजी आजोबा नसतील आई नोकरी करणारी असेल अशा कुटुंबात एखादी महिन्यानी बाई ठेवली जाते जी मुलाला दिवसभर सांभाळेल त्याला खाऊपिऊ घालेल ती बाई सुद्धा पालकाच्या तसेच पालकत्वाच्या व्याख्येत बसते.

      मुलांना खाऊ पिऊ घालण्या पलिकडे पालकत्वाची जबाबदारी आहे. खाऊपिऊ घातल्याने मुलाची वाढ होईल विकास नाही. मुलाची वाढ नैसर्गीक असली तरी उत्तम सकस आहारावर वाढीची गुणवत्ता अवलंबून असते ही जाण पालकांना असावी. विकास हा नियोजन बद्ध असावा. मुलाचा सर्वांगीण विकास ही पालकत्वाची मोठी जबाबदारी आहे.

      मूलं निरागस, निःपाप, कोरी पाटी असतं गर्भात जीव फुटल्यापासून त्याच्यावर संस्काराचं शिंपण जरूरी असतं. जे ऐकते ते गर्भातही मूल ग्रहण करत असतं.

      जन्मापासून मूल जे दिसतं, जे ऐकू येतं ते सर्व ग्रहण करत असते व मेंदूत साठवत जाते. बाळाचा मेंदू व बाळ कशानीही थकत नाही. काहीही शिकवा तो शिकतो व स्मृती कप्प्यात साठवतो. म्हणूनच त्याच्या अवती भोवती असणारे पालक ह्या व्याख्येत मोडणारे सजग असावे. नियोजनपूर्वक बाळाच्या मेंदूला खादय पुरविणारे असावे.

       पालक म्हणून पालकत्व निभवणाऱ्या इतरांपेक्षा आई वडिलांचा पालकत्वात ऐंशी टक्के वाटा असतो इतरांचा वीस टक्के. असा आपण ढोबळ अंदाज घेवू कारण मुख्य पालक आई वडिल असतात व पालकत्वाच्या जबाबदारीत सहाय्यभूत पालक म्हणजेच आजी आजोबा, संगोपनासाठी ठेवलेली बाई हे असतात.

     मूल म्हणजे आईवडिलांचं प्रतिबिंब असतं. ते आईवडिलांचं अनुकरण करित असतं. म्हणून आईवडिलांनी आदर्श पालकत्वासाठी स्वतःमधिल अवगुण दूर सारावे म्हणजेच मुलानी कसं बनावं? तसं आईवडिलांनी स्वतःत बदल करावेत. एक आदर्श त्यांचासमोर ठेवावा म्हणजे मुलाचा विकास योग्य दिशेने होवून मुलाचे व्यक्तीमत्व विकसित होईल.

    आईवडिल व साहाय्यभूत पालक यांच्यात सुसंवाद असावा आईवडिल सांगतात एक व आजी आजोबा सांगतात एक असे व्हायला नको यासाठी सतत मुलांच्या संगोपनाबाबत आईवडिल व आजी आजोबा यांच्यात चर्चा घडून घ्यावी. सुसंवाद साधण्यात सातत्य हवे. एकदा सूचना केल्या की जबाबदारी संपली असे होत नाही. पीढीच्या अंतरामुळे विचारात अंतर असेल तर आपले मत आईवडिलांनी योग्य रित्या पटवून सांगावे दोघांच्या समन्वय साधूनच मुलांवर योग्य संस्कार करून आदर्श पालकत्व साकारेल.

      काळानुरूप पालकत्वाची सुत्रे बदलेली असली तरी मूलभूत गोष्टी तशाच आहेत. म्हणून आजी आजोबा व आईवडिल यांच्यात सकारात्मक चर्चा होणे गरजेचे असते.

  आदर्श पालकत्वासाठी काही सुत्रे आहेत ते सुत्रे पालकांनी पाळली तर नक्कीच ते एक आदर्श पालक बनू शकतील . जसे-   पालकांची देहबोली, पालकांची भाषा ही सकारात्मक असणे गरजेचे मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ देणे गरजेचे. मुलांच्या अपयशासाठी मुलांना दोष देवून मोकळे होण्यापेक्षा मुलांच्या यशापयशात वाटेकरी होणे गरजेचे. मुलांनी मागीतली ती गोष्ट लगेच न देता कधी-कधी नाही म्हणणे गरजेचे जेणेकरून नकाराची ओळख मुलांना होईल परंतु एखादया गोष्टीसाठी नाही का म्हटले याचे संयुक्तीक कारणे सांगणे अति महत्वाचे हेही पालकांनी लक्षात घ्यावं.

    आजकालच्या काळात टी.व्ही, मोबाईल, इंटरनेट या साधनांनी धुमाकूळ घातलाय त्याचा योग्य वापर कसा करावा हेसांगून त्याची | निश्चीत वेळ ठरवून वापरू दयावे.

     आजकाल शाळेचे होमवर्क करतांना आईवडिल प्रमाणापेक्षा जास्त मदत करतात मदत ऐवजी मार्गदर्शन करा. प्रश्नांचा मालकी हक्क स्वतःकडे न ठेवता मुलांना विचार करू द्या आयतं देवू नका त्यामुळे ते सक्षम, सबळ होणार नाहीत.

आनंदायी पालकत्व आदर्श पालकत्व ठरतं उगीच शिस्तीच्या नावावर मुलांना डॉमिनेट करू नका. थोडं चुकलं मूलं की मूर्ख, वेंधळा असे लेबलिंग लावू नका चुका आणि शिका हाच मंत्र शिकण्याचा सांगा आपल्या पाल्याला.

     मुलांचा आत्मसन्मान दुखावणार नाही अशी भाषा वापरा. चूक सांगायची झाल्यास योग्य वेळ व योग्य शब्द गरजेचे हे विसरू नका.

    आदर्श पालक उद्याचा आदर्श नागरीक घडवू शकतात म्हणून मूलं जन्माला आलं तसं वाढेल असं नाही आदर्श पालकत्व स्विकारून मुलांना योग्य वातावरण निर्माण करून सकारात्मक वातावरणात मुलांचा विकास व वाढ घडवून आणणे हे सोपे काम नाही ती मोठी जबाबदारी आहे.

      काय करू नये? हे सांगीतल्या पेक्षा काय करावे असं सांगून मुलांचा आत्मविशवास वाढवा, मुलांच्या स्वप्नांचा आदर करून मुलांशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवून त्यांच्या पंखांना बळ देवून मुलांच्या पाठीशी उभं राहिलं की मुलाचा सकारात्मक विकास होईल हे आदर्श व जबाबादार पालक जाणतो.

   देशाचं उद्याचं भविष्य ज्याच्या हातात आहे त्या पालकानी वर्तमान काळाची पावलं ओळखून भूतकाळातून बोध घेवून व भविष्याचा वेध घेवून जाणीवपूर्वक पालकत्व स्वीकारलं तर मुलांचं पर्यानं देशाचं भविष्य उज्जवल आहे यात शंका नाही.

    जसं पालकत्व तसं मुलाचं व देशाचं भविष्य म्हणूनच म्हणतात ना “पालकत्वात दडलयं भविष्य देशाचं” हे अगदी खरं आहे.(साभार: राजेश चायंदे प्रतिनिधी)

अॅड . नीता प्रफुल्ल कचवे अमरावती