माझे कुटुंब – माझी जबाबदारी

संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाने ग्रासले असून भारतामध्ये सुद्धा या कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात बाधितांची संख्या जास्त असल्यामुळे या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासाठी राज्य सरकारनं पुनश्च ‘हरीओम’ अर्थात ‘मिशन बिगिन अगेन’ला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन या पार्श्वभूमीवर सरकारने केले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती स्फोटक बनत असल्यामुळे इस्त्रायलसह काही देशांनी परत एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे. काही देशांनी कडक कायदे केले आहेत. नियम पाळणार नाही तर त्यांना मोठा दंड भरावा लागतो, पण स्वतःहून आपण नियम पाळणे हे कधीही चांगले. आपल्याला नवीन जीवनशैली आणावी लागणार आहे. माझे कुटूंब- माझी जबाबदारी ही त्याचीच सुरुवात आहे. ही मोहीम कोरोना विरुद्ध आक्रमकपणे लढून दिशा दाखविणारी आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने ही जबाबदारी घ्यायची आहे. 15 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या जनसर्व्हेक्षणात सर्वांनाच आपला खारीचा वाटा उचलायचा आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी सरकारची एक टीम जाईल. तेव्हा आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी मदत करून आपल्या कुटूंबाची आरोग्य विषयक माहिती द्यायची आहे. सर्दी खोकला ताप व कोरोनाशी संबंधित इतर लक्षणे आढळल्यास कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ही माहिती आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांना देऊन स्वतःची व आपल्या कुटुंबातील सदस्यांसह इतरांची देखील काळजी घ्यायची आहे, कारण कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, या आजाराचे फार मोठे आव्हान आज आपल्या समोरच नव्हे तर संपूर्ण जगासमोर आहे.

सद्या वातावरण बदलाने अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसह तापाची लक्षण जाणवत असले तरी कोरोनाच्या भीतीने अनेक नागरीक धास्तीने घसरगुती उपाय करून आजार अंगावर काढतात. अशा रुग्णांना डॉक्टरांकडे जायला भीती वाटते. दवाखान्यात जावे तर कोरोना व तपासणीची भीती आणि नाही जावे तर प्रकृती आणखी खालावते का? याची चिंता नागरिकांना असते. या पार्श्वभूमीवर नागरिक घरीच उपचार घेत आहे. घरी प्राथमिक उपचार करण्यास हरकत नाही, मात्र डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायला पाहिजे, मात्र अनेक रुग्ण बाधित असून सुद्धा घरीच प्राथमिक उपचार करत असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला आटोक्यात आणायचे असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या व आरोग्य विभागाच्या वैद्यकीय उपचारासह अभियानाला योग्य प्रतिसाद देऊन ही मोहीम यशस्वी करण्यास आपले योगदान दिले पाहिजे.

‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत ज्यांना कोव्हिडंची लक्षणे जाणवत असेल किंवा सर्दी, खोकला, ताप असेल तर अशा रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांना दाखवून दिलेल्या सुचनांनुसार उपचार करून शासन व प्रशासनाला मदत करायला पाहिजे. तेव्हा प्रत्येक नागरिकांनी सरकार, आरोग्य विषयक अधिकाऱ्यांना योग्य ती मदत करून आपले योगदान द्यावे. शिवाय मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ब्लॅक बेल्ट’ म्हणून करायचा आहे. सदा सर्वदा मास्क लावावायचा आहे शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. बोलताना ‘फेस टू फेस’ बोलणं टाळायचं आहे.  शिवाय ऑनलाईन खरेदीवर भर देखील द्यायचं आहे, की जेणेकरून गर्दीला रोखणे शक्य होईलकोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन होणं आवश्यक आहे. सरकारकडून आवाहन केलं जातं आहे, मात्र तरी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावावर तर काही अकारण गर्दी करून सामाजिक अंतर राखण्याचे भान विसरत आहे. करोना विरुद्धच्या नव्या मोहिमेत सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील शहर, गावे, वस्त्या यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी आणि प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहे. मोहिमेची पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर या कालावधीत होईल आणि दुसरी फेरी दिनांक 11 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत होणार आहे आणि मोहिमेची सांगता 25 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरु झाली असून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्य विषयक माहितीचे संकलन करत आहेत. लोकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत, यामध्ये कोरोना बाधित, बरे झालेले रुग्ण, त्यांची पोस्ट कोविड स्थिती याबाबत माहिती घेत आहेत. लोकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करायला पाहिजे. कोरोनाला दूर ठेवून सुरक्षित राहण्यासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल. अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळवणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन देशातील प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे जनसर्व्हेक्षण कोण्या एकट्या दुकट्याचं कार्य नसून सामूहिक असून प्रत्येकाने आपला वाटा उचलायचा आहे. मला कोरोना नाही म्हणून कोणीही आपले अंग काढून घेवु नये. आधीच या मोहिमेला उशीर झाला आहे. कडक लॉकडाऊन काळातच सर्व शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे काम करायला हवे होते तातडीने कोव्हिडं सेंटर्स उघडायला हवे होते, ती अजूनही उभी राहत आहे. ऑक्सिजनचा तुतवडा, रुग्णवाहिकांची कमतरता, शववाहिकांचा अभाव, डॉक्टरांचा अभाव आदी अपुऱ्या सुविधांसह महाराष्ट्र वाटचाल करतो आहे, कोरोनाशी लढा देतो आहे, आता खरी गरज या मोहिमेची तातडीने प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची व आपण होऊन नियम पाळण्याची व शक्य तितका आपला सहयोग देण्याची. कोरोनाला दूर ठेवून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून या मोहिमेला अधिक सफल करण्याची गरज आहे. ‘जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक भूमिका असते, जी सांगते की, तुमच्या कृतीतून घडणाऱ्या आणि घडवण्याच्या परिणामांचं तुम्ही स्वत: कारण आहात. जबाबदारी कुणीही दुसऱ्यावर लादू शकत नाही. जबाबदारी हे पूर्णसत्य नसेल, पण ते तुम्ही स्वत: स्वत:साठी ठरवून निर्माण केलेलं, उभं राहण्याचं एक स्थान असतं याच भान प्रत्येकाने ठेवले तर कोणतीही गोष्ट शक्य होण्यास फारसा वेळ लागणार नाही.

(लेखक एस. के. पोरवाल महाविद्यालय, कामठी नागपूर येथे प्राध्यापक आहेत.)