आपल्या सहकार्याची अपेक्षा

संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाने ग्रासले असून भारतामध्ये सुद्धा या कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात बाधितांची संख्या जास्त असल्यामुळे या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासाठी राज्य सरकारनं पुनश्च ‘हरीओम’ अर्थात ‘मिशन बिगिन अगेन’ला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन या पार्श्वभूमीवर सरकारने केले आहे.

सद्या वातावरण बदलाने अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसह तापाची लक्षण जाणवत असले तरी कोरोनाच्या भीतीने अनेक नागरीक धास्तीने घसरगुती उपाय करून आजार अंगावर काढतात. अशा रुग्णांना डॉक्टरांकडे जायला भीती वाटते. दवाखान्यात जावे तर कोरोना व तपासणीची भीती आणि नाही जावे तर प्रकृती आणखी खालावते का? याची चिंता नागरिकांना असते. या पार्श्वभूमीवर नागरिक घरीच उपचार घेत आहे. घरी प्राथमिक उपचार करण्यास हरकत नाही, मात्र डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायला पाहिजे, मात्र अनेक रुग्ण बाधित असून सुद्धा घरीच प्राथमिक उपचार करत असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला आटोक्यात आणायचे असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या व आरोग्य विभागाच्या वैद्यकीय उपचारासह अभियानाला योग्य प्रतिसाद देऊन ही मोहीम यशस्वी करण्यास आपले योगदान दिले पाहिजे.

‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत ज्यांना कोव्हिडंची लक्षणे जाणवत असेल किंवा सर्दी, खोकला, ताप असेल तर अशा रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांना दाखवून दिलेल्या सुचनांनुसार उपचार करून शासन व प्रशासनाला मदत करायला पाहिजे. तेव्हा प्रत्येक नागरिकांनी सरकार, आरोग्य विषयक अधिकाऱ्यांना योग्य ती मदत करून आपले योगदान द्यायला काय हरकत आहे…