अंजली कडू, अमरावती, मो.८००७२५११५९

डॉ. राधाकृष्णन यांचा लघुपट पाहून आदर्श शिक्षकांची प्रतिमा मूलांच्या डोळ्यापुढे राहते. शिक्षकांप्रती विद्यार्थांचा आदभाव दिसून येतो आणि एका शिक्षकासाठी  विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता लाखमोलाची असते. विद्यार्थांची शिक्षकांप्रती असलेली आपुलकी, प्रेम व विश्वास आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षा केव्हाही मोठेच असतो.

उपक्रमाची गरज व महत्त्व-

सहशालेय उपक्रम म्हटले कि, महापुरुषांची जयंती पुण्यतिथी, विशेष दिन तसेच राष्ट्रीय सण अश्या कितीतरी उपक्रमांचा समावेश यात असतो व सर्व शाळेत हे उपक्रम साजरे केले जातात. माझ्या शाळेत सण- उत्सव या उपक्रमासोबतच सहशालेय उपक्रम हाहि तेवढ्याच उत्साहाने राबविण्यात येतो. फक्त विशेषतः असते ती नाविण्यतेची. कारण तोच तोचपणा लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडत नाही आणि म्हणूनच प्रत्येक सहशालेय उपक्रमाला आनंददायी व नाविण्यपूर्ण कृतीची जोड देऊन हे उपक्रम साजरे केले जातात. याची खरी गरज म्हणजे मूलांना आनंदी वातावरणात शाळेतील शिक्षण देणे. घरात जसा प्रत्येक क्षण उत्साहात व आनंदात पार पडतो. म्हणून तर घराची ओढ मूलांना जास्त असते व या विविध उपक्रमांद्वारे मूलांना शाळेची ओढ लागावी. जेणेकरुन शाळा हे कुटूंबच आहे, अशी भावना मूलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. शाळेत विद्यार्थी मनापासून आले तर शिकणे ही प्रक्रिया अधिक मनोरंजक होईल आणि मनापासून केलेली कोणतीही गोष्ट चिरकाल स्मरणात राहते.

उपक्रमाचे उद्दिष्ट-

  1. शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते दृढ होते.
  2. शालेय कामकाजाचा परिचय मूलांना होणे.
  3. शालेय जबाबदारीची ओळख पटणे.
  4. मूलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणे.
  5. आपले मत स्पष्टपणे नोंदविता येणे.
  6. सभाधिटपणा निर्माण होणे.
  7. शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्याची संधी मिळणे.
  8. सुक्ष्म निरिक्षण क्षमता वाढविणे.

उपक्रमाची कार्यवाही- 

गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु: , गुरुर्देवो महेश्वर:

गुरु: साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नम:

शिक्षक दिन हा प्रत्येक शिक्षकाच्या जिवनातील महत्त्वाचा दिवस असतो. कारण एक शिक्षक म्हणून मिळविलेला मान, केलेले कार्य, घडविलेले विद्यार्थी या सर्वांची या दिवशी विशेष जाणीव होते.आणि या दिवशी या चिमुकल्यांनी दिलेल्या शुभेच्छा तर मन भारावून टाकतात.त्यांच्यारुपाने तर खरी शिक्षक दिनाची पावती मिळते.

 या दिवशी आमच्या शाळेत तर विशेष स्वयंचलित शाळेचे आयोजन केले जाते. असे म्हणतात शिक्षक हा मार्गदर्शक असतो फक्त वाट दाखवायची, विद्यार्थी आपोआप त्यावाटेवर चालणे शिकतात हे अगदि बरोबर आहे. शिक्षक दिनाचे महत्त्व व डॉ. राधाकृष्णन यांचा जिवन परिचय देतांना  मूलांना मी माझ्या शालेय जिवनातील आठवणी सांगितल्या आणि मूलांनी तसे करायचे ठरविले. आता विद्यार्थ्यांना वाट दाखविणाऱ्या शिक्षकानेच जर वाट अडवली तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कसा वाढणार! म्हणून ४ थी ५ वी तील विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनेला मी दुजोरा दिलाव शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मोठ्या वर्गातील विद्यार्थी (४ थी, ५ वी) शाळेचे कामकाज पाहतात. आधीच सर्व कामकाजाचे  नियोजन केल्या जाते. शिक्षक दिनाच्या दिवशी सुरुवातीला डॉ. राधाकृष्णनन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येते.त्यांच्याजिवनावर आधारित लघुपट मूलांना दाखविण्यात येतो. कारण तोंडि सांगितलेले मूलांना तेवढे लक्षात राहत नाही जेवढे पाहून स्वत: समजून घेऊन लक्षात राहते. पारंपारिक भाषण पध्दतीला सारुन डिजिटल पध्दतीचा वापर करण्यासाठि हा प्रयोग. या कार्यक्रमाला  शा.व्य.समिती अध्यक्ष सदस्य, गावकरी उपस्थित असतात.यानंतर सुरू होते खरी शिक्षक दिनाची मज्जा! शाळेतील मु.अ , शिक्षक, खिचडिवाले, चपरासी यांची  कामे विद्यार्थी पाहतात. एकंदर एका दिवसाची  स्वयंचलित शाळेला सुरुवात होते. परिपाठापासून तर शाळा सुटल्यावर होणारे वंदे मातरम् पर्यंत, सर्व शालेय कामकाज विद्यार्थी करतात व शिक्षक निरिक्षकाची भूमिका पार पाडतात.

१) स्वयंचलित शाळा – यास्पर्धेत शिक्षक बनलेला जो विद्यार्थी उत्तम पाठ घेतो तसेच शालेय कामकाजाचा इतर भुमिका हुबेहूब पार पाडतो. त्यातील मु.अ व शिक्षक निरिक्षण करुन क्रमांक काढतात.

२) वेशभूषा स्पर्धा- शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वच बाबतीत आदर्श असतो. मग ते शिकवण्यात असो कि राहणीमानात. विद्यार्थी नेहमी आपल्या शिक्षकांचे निरिक्षण करीत असतात व त्याला तसे अनुकरण करायलाही आवडतं म्हणूनच म्हणतात न शिक्षक चुकायला नको कारण त्याच्या एका चुकीवर देशाचे भवितव्य अवलंबून असते. या स्पर्धेत विद्यार्थी शाळेतील शिक्षकांचे पात्र रंगवतात. एकप्रकारे त्यांच्यासारखे वागतात. या स्पर्धेत क्रमांक विद्यार्थीच देतात. कारण कोणत्या विद्यार्थ्यांने अचूक वेशभूषा केली. हे विद्यार्थीच सांगू शकतात.

३) स्वछंदी शाळेचे आयोजन– शिक्षक दिनानिमित्त जरी स्वयंचलित शाळा असली, तरी यात १ तासिका स्वछंदि शाळेची असते. या शाळेत कुणी विद्यार्थी नाही,कुणी शिक्षक नाही. सर्व आपले छंद जोपासतात. शिक्षकहि विद्यार्थ्यांप्रमाणे आवडिने जे वाटेल उदा- चित्रकला, गायन, मातीकाम, कागदकाम, लेखन- वाचन, रांगोळी काढणे, खेळ खेळणे असे विविध प्रकारच्या पण आवडिच्या कृती करतात. मूलात मूल होऊन खऱ्या शिक्षकदिनाचा आनंद घेतात. विद्यार्थी सुध्दा शिक्षकांसोबत काहिच बंधने न पाळता वागतात.एकप्रकारे स्वप्नातील शाळा असावी तसे वातावरण असते आजुबाजुला .अश्याप्रकारे शिक्षक विद्यार्थी आनंदात, उत्साहात हा शिक्षकदिन कायम लक्षात राहिल असा साजरा करतात. हिच  खऱ्या अर्थाने शिक्षकांना मिळालेली शिक्षकदिनाची भेट असे म्हणायला हरकत नाहि. खरा शिक्षकदिन हा मूलांसोबत हसत खेळत, त्यांचा तो निरागस आनंद, चेहऱ्यावरिल भाव हिच मोठी कमाई असते एका शिक्षकासाठी. 

उपक्रमाची फलनिष्पत्ती- 

एखाद्या शाळेतील विद्यार्थी जर शिक्षकांसाठी शिक्षक दिनाचे आयोजन करत असतील तर यापेक्षा मोठी शिक्षक दिनाची फलनिष्पत्ती असूच शकत नाहि. शिक्षकांसाठी काहितरी करावं. हा विचार खूप काहि मुलांना शिकवून जातो. शिक्षक विद्यार्थीमधील नाते अधिक दृढ होते.मूलांना शालेय कामकाजाबाबत अनूभव मिळतो. जबाबदारीची जाणीव व आत्मविश्वास निर्माण होतो.वेशभूषा स्पर्धेतून निरीक्षण क्षमता विकसित होते. स्वछंदि शाळेचे आयोजन करुन मूलांच्या आवडी निवडी  बाबत शिक्षकांना माहिती मिळते. जेणेकरुन त्याचा वापर पुढे करता येऊ शकतो. डॉ. राधाकृष्णन यांचा लघुपट पाहून आदर्श शिक्षकांची प्रतिमा मूलांच्या डोळ्यापुढे राहते. शिक्षकांप्रती विद्यार्थांचा आदभाव दिसून येतो आणि एका शिक्षकासाठी  विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता लाखमोलाची असते. विद्यार्थांची शिक्षकांप्रती असलेली आपुलकी, प्रेम व विश्वास आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षा केव्हाही मोठेच असतो.

(सदर लेखाच्या लेखिका सौ. अंजली कडू ह्या जि. प. प्राथ. मराठी शाळा, झापल, पं. स. धारणी जि. अमरावती येथे शिक्षिका आहेत.)