आदिनाथ सुतार, अहमदनगर मो.९८९०७०९१७५

मुलांच्या मनात शिक्षक म्हटलं की डोळ्यासमोर उभा रहातो तो कडक शिस्तीचा माणूस, विद्यार्थ्यांमध्ये दरारा आणि धाक असणारा. मात्र पुढे चालून जेव्हा विद्यार्थी व्यावसायिक आयुष्यात स्थिरस्थावर होतात तेव्हा त्यांना कडक शिस्तीच्या चेहऱ्यामागचा वडिलांप्रमाणे ममत्व वाटणाऱ्या माणसाचेही  दर्शन घडत असते. विद्यार्थी ही कृतज्ञतेची भावना जेव्हा शिक्षकांजवळ व्यक्त करतात तो क्षण शिक्षकांच्या आयुष्यात कृतार्थतेचा क्षण असतो.

गेल्या २५ वर्षाच्या शिक्षकी पेशाच्या काळात अनेक विद्यार्थ्याचे जीवनपट नजरेसमोरून तरळत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवले आहे. या अल्पशा शिक्षकी जीवन प्रवासात सहवासात आलेला व लक्षात राहिलेला विद्यार्थी म्हणजे अविनाश बापू घिघे हा विद्यार्थी होय.

मी पिंपरकणे आश्रमशाळेत नुकताच बदलून आलो होतो. माझ्याकडे आठवीचा वर्ग होता, वर्गात चोपन्न  विद्यार्थी होते. पिंपरकण्यात इमारत व इतर आवश्यक सुविधा मोडकळीस आल्या होत्या, शैक्षणिक वातावरण नव्हते. अशा स्थितीत “जिथे जावे तिथे सकारात्मक विचाराने काम करणे” हा माझा पिंड असल्यामुळे आहे त्या परिस्थितीत माझं  शैक्षणिक कामकाज चालू होतं. दरवर्षी नवे विद्यार्थी येत असतात,  काही वर्गात येतात तर काही पटावर येतात. काही मात्र वर्षानुवर्ष मनात खोलवर रुजून राहतात. त्यांचे समाजामधले अंकुरणे आपल्या मनाला फुलवत राहते. एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असला तर शिक्षकांचा तो आवडता असतो, मात्र शैक्षणिक कालखंडात विशेष कामगिरी करू न शकलेले विद्यार्थी सुद्धा कोणात्यातरी  कारणानेही  आवडती असतात. जे विद्यार्थी गुणवत्तेत येतात त्यांच ते भविष्य चमकवत असतात, तर काही असेही विद्यार्थी असतात की जे आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या परीक्षेत मात्र ते गुणवत्तेत येत असतात. आणि त्यांच्या  आयुष्याचं ध्येय सध्या करत असतात. पिंपरकणे आश्रमशाळेतील अविनाश घिगे या विद्यार्थ्यांविषयी मला कुतूहल होते. तो काही तरी आयुष्यातलं हारवल्यासारखं वावरत असायचा.  मी त्याची माहिती जाणून घेतली त्याला बोलते केले. वर्गातील प्रत्येक उपक्रमात त्याला सहभागी करून घेतले  त्याला माझा विश्वास वाटला. मग माझ्याशी जवळीक निर्माण झाल्यानंतर तो बोलता झाला. काही महिन्यांपूर्वी व्यवसायाने पोलिस असलेल्या त्याच्या वडिलांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले होते. भावकीतील चुलते व आजोबा यांच्या भरवश्यावर न राहता त्याच्या सातवीत शिकणाऱ्या लहान भावाला आईने  सासरी सोडून त्याची आई अविनाशला बरोबर घेऊन आपल्या माहेरी रहायला  आली होती, परंतु त्याच्या वडिलांनी जाता-जाता त्यांचे आजारपण आईला दिले होते, त्याची आई देखील सदैव आजारी असते असे तो सांगत असे. त्याचे आजोबा(आईचे वडील)कधी कधी शाळेत येऊन अविनाश विषयी व एकूण परिस्थिती विषयी बोलत असायचे .दिवसामागून दिवस जात होते.

IMG-20200904-WA0001.jpg

यंदा अविनाश दहावीला होता. आता अविनाशचे मन शाळेत रमू लागले होते. वडिलांची येणार्या पेन्शनवर घर व आईच्या आजारपणाचा  खर्च चालत असायचा. परंतु पुढे आजारपणामुळे त्याच्या आईचेही निधन झाले होते. दहा बारा दिवस अविनाश शाळेत आलाच नाही. त्याच्या मामाने अविनाशची आई वारल्याबद्दल मला फोन करून  सांगितले होते.वर्गातील मुलांना अविनाशवर ओढावलेल्या दुःखाच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. काही  दिवसानंतर तो शाळेत आला परंतु तो शाळेच्या परिसरात भांबावून दबून गेल्या सारखा वावरत होता. तो विद्यार्थ्यांमध्ये कायम चेहरा दडवून असायचा, कोणाशीही न बोलणारा तासालाही अधे मधे येणारा, वर्गात खिडकीजवळील शेजारच्या बाकावर बसून डोळे आकाशाकडे रुतवून बसलेला असे. त्याचा चेहरा तटस्त भावदर्शन आणि चिंताखुणांनी माखलेला असे.

दहावीचं वर्ष असल्याने मी वर्ग शिक्षक या नात्याने  त्याच्या बरोबरच सर्वच मुलांच्या बाबतीत सकारात्मक होतो, हलक्या फुलक्या आनंददायी शैक्षणिक उपक्रमातून मुलांना अभ्यासामध्ये रुची निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असायचा.आता दुख: विसरून अविनाश मुलांमध्ये रमू लागला होता. वडिलांकडील चुलते व आजोबा तसेच आई कडील मामा व  आजोबा यांच्यातील आर्थिक कलहाचा शेवटी मला समेट करावा लागला होता. या सर्व परिस्थितीतून अविनाशला बाहेर काढणे आवश्यक होते मग मी  त्याला मुख्याध्यापकांच्या परवानगीने शाळेतील वसतीगृहात राहायला यायला सांगितले,मुलांच्या सहवासात  तुझे मन रमेल असं त्याला  सांगितलं त्यांने ते ऐकलं होतं. आता तो शाळेत व अभ्यासात रमू लागला.दिवसामागून दिवस पुढे सरकत गेले. दुःख मागे टाकून स्वतःला त्याने अभ्यासात झोकोन दिले होते. पुढे दहावी पास झाल्या नंतर लवकरच  तो वडिलांच्या जागेवर बालपोलीस म्हणून पोलिस सेवेत रूजू झाला.  शिक्षण आणि जगणं या दोन्ही प्रश्नावर स्वर होऊन त्याच्या  आयुष्याची लढाई चालू आहे .त्याच्या पोलिस अधिकारी होण्याच्या स्वप्नापर्यंत. 2016 ला माझी पिंपरकणे येथून बदली झाली होती. मी  मवेशी ता.अकोले येथे हजर झालो होतो. चार-पाच वर्षाच्या कालखंडात मी अविनाशला विसरलो होतो. दरम्यान टाळेबंदी पूर्वी मी मुंबईला काही कामानिमित्त मंत्रालयात गेलो होतो, तिथे कँटीनला मी जेवण करत असतांना अविनाशने मला पाहिले. हातातील जेवणाचं ताट टेबलावर ठेवून तो माझ्याकडे आला. 

त्याच्या समवेत त्याचे दोन सहकारी पोलीसही त्याच्या बरोबर होते. जेवणानंतर मंत्रालय परिसरात  अविनाश माझ्याशी बोलता झाला.  त्याच्या पिंपरकणे येथील आश्रमशाळा जीवनाविषयी माझ्याशी मनसोक्त  बोलला. मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन च्या सुरक्षा राक्षकात तो ड्युटीवर होता, परत मुंबईला आल्यानंतर मला भेटल्याशिवाय जावू नका,असे आग्रहाने मला त्याने सांगितले होते.  मी मंत्रालयातच असतो. असे त्याने पुन्हा-पुन्हा मला  सांगितले व माझा निरोप घेतला.

शाळेत विद्यार्थी वेगवेगळ्या  सामाजिक,भौगोलिक,  सांस्कृतिक अवकाशातून आलेले असतात. या गोष्टी लक्षात घेऊन शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत नातं तयार करावं लागतं, या नात्याच्या दुहेरी संवादातील आंतरिक आनंदाच्या या वाटेवर चालताना विद्यार्थ्यांसोबत आपणही स्वतः समृद्ध झाल्याची भावना वाढत जाते. अशा मुलांबद्दल शिक्षकांना नेहमीच सार्थ अभिमान वाटत असतो. मुलांच्या मनात शिक्षक म्हटलं की डोळ्यासमोर उभा रहातो तो कडक शिस्तीचा माणूस, विद्यार्थ्यांमध्ये दरारा आणि धाक असणारा. मात्र पुढे चालून जेव्हा विद्यार्थी व्यावसायिक आयुष्यात स्थिरस्थावर होतात तेव्हा त्यांना कडक शिस्तीच्या चेहऱ्यामागचा वडिलांप्रमाणे ममत्व वाटणाऱ्या माणसाचेही  दर्शन घडत असते. विद्यार्थी ही कृतज्ञतेची भावना जेव्हा शिक्षकांजवळ व्यक्त करतात तो क्षण शिक्षकांच्या आयुष्यात कृतार्थतेचा क्षण असतो. आपल्या अवतीभवती धडपडणार्या आणि साफल्य कृतार्थ भावना अविनाश सारखा अनेक मुलांच्या घडणीत सामावली आहे. त्याच्या धडपडीचा प्रवास अजुनही सुरूच आहे. 

(श्री. आदिनाथ सुतार हे शासकीय माध्यमिक  आश्रमशाळा, मवेशी, ता. अकोले,
जि. अहमदनगर येथे शिक्षक आहेत)