रविंद्र पागीरे, अहमदनगर मो. ९५०३३३४३५५

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात गेल्या काही दिवसात अनेक बदल शासनाकडून झालेले आहेत. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या वर्गातील विद्यार्थ्याची घेतली जात होती परंतु गेल्या काही दिवसापासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गासाठी घेतली जाते. तसेच एकूण गुण विषयातील उपघटकांचे स्वरूप, इंग्रजी विषयातील प्रश्न पूर्णपणे इंग्रजीतच असणे असे काही ठळक बदल झालेले आहेत. परंतु जेंव्हापासून ही परीक्षा पाचवी व आठवी च्या वर्गासाठी सुरु झाली तेंव्हापासून या परीक्षेचा महाराष्ट्राचा निकाल बराच घसरलेला दिसतो.

निकाल वाढण्यासाठी संभाव्य उपयोजना:-

 • शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांचे या परीक्षेबद्दल व विषयाबद्दल प्रबोधन करण्यात व्हावे त्यामुळे या परीक्षेच्या वेगळेपणाला व्यापक स्वरुपात प्रसिद्धी मिळेल व पालकांसह सर्वच घटक जागृत होतील.
 • या परीक्षेतील यशासाठी शालेय वेळेव्यत्यरिक्त जादा तास घेतले जाने अपरिहार्य आहे हे सत्य शिक्षक आणि पालक यांनी स्वीकारले जावे.
 • शाळेतील सर्वच शिक्षकांना शिष्यवृत्ती वर्गाला अध्यापन करण्याची संधी मिळावी त्यामुळे सर्वच शिक्षकांचे ज्ञान आणि आणि परीक्षेचे गांभीर्य सर्व शिक्षक यांच्यापर्यंत जाईल.
 • शिष्यवृत्ती परीक्षेबाद्द्लच्या तज्ञ शिक्षकांकडून इतर शिक्षकांना या परीक्षेसाठीचे साहित्य, प्रश्नपत्रिका स्वरूप, क्लुप्त्या, प्रश्संच, मार्गदर्शिका याबद्दल मार्गदर्शन केले जावे.
 • माहेवार आणि घटकानुसार शाळास्तरावर सराव चाचण्या घेतल्या जाव्यात आणि त्याच्या निकालाचा वापर फक्त वर्गशिक्षकाला आपल्या अध्यापनाच्या मूल्यांकनासाठी केला जावे जेणेकरून पुढील काळात या विश्लेषणाचा वापर करून संबंधित शिक्षक आपल्या मार्गदर्शनात विशिष्ठ घटकाला अधिक महत्व अथवा सराव घेईल.
 • व्यक्तीभिन्नतेचे बालमानसशास्त्राचे चे तत्व स्वीकारले जावे. व त्यानुसार ज्या मुलांची स्वतः ची इच्छा असणाऱ्या  मुलांनाच या परीक्षेसाठी बसविण्यात यावे. जेणेकरून वर्गशिक्षक खास मुलांना विशेष मार्गदर्शन करू शकेल कारण सर्वच मुलांना या परीक्षेला बसविले तर वर्गशिक्षकासमोर निकाल वाढविण्यासाठी खास प्रयत्न करावेत कि जिल्हा व राज्य यादीत येऊ शकणाऱ्या अतिप्रज्ञावान मुलांसाठी अध्यापन करावे असे द्वंद्व उभे राहते.
 • या परीक्षेत चांगले यश, गुण मिळविणाऱ्या मुलांचा, शाळेचा, वर्गाशिक्षकाचा गुणगौरव केला जावा त्यामुळे संबंधिताना अधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि इतरांना यापासून स्फूर्ती मिळेल.
 • सर्व शाळेत किमान इयत्ता दुसरी पासूनच शिष्यवृत्ती परीक्षेस पूरक अश्या परीक्षेची तयारी घेतली जावी. जेणेकरून पाचवीच्या परीक्षेवेळी या परीक्षेसाठी मुले अगदीच नवखी असणार नाहीत. तसेच एखाद्या वर्षी एखाद्या शाळेत पाचवी च्या  वर्गाला अध्यापनासाठी बदली होऊन नवीन शिक्षकाला जरी अध्यापन करण्याची वेळ आली तरी त्याचा निकालावर फारसा प्रतिकूल परिणाम होणार नाही.  
 • शाळेतील एकूण वातावरण हे स्पर्धापरीक्षेस पूरक असावे. शाळेतील लहान वर्गातील मुलांनी वरच्या वर्गातील मुलांचे मार्गदर्शन घ्यावे तर इतर शिक्षकांनी शाळेतील तज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन घ्यावे.
 • तालुका स्तरावर या परीक्षेबाबत येणाऱ्या अडचणीवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात.
 • शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जुलै पासूनच या परीक्षेची तयारी शाळास्तरावर घेतली जावी.
 • प्रत्येक शाळेत पाचवी व आठवी च्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकाला शक्य असल्यास शालेय प्रशासनाने शाळेतील इतर कामे शक्येतो कमीत कमी दिली जावी.
 • एखाद्या शाळेचा निकाल कमी लागला तर त्याच्या कारणमीमांसा करून त्यावर साधक बाधक चर्चा करावी व संबंधित शाळांनी पुढील वर्षात आपल्या झालेल्या तृटी पूर्ण करून घेऊन निकाल वाढवण्याचा प्रयत्न करावा.
 • जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यासाठी वेळोवेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मार्गदर्शन करतात. त्यामध्ये भर घालून तालुका प्रशासनाने शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन माहे जुलै ते डिसेंबर अखेर सर्व घटकांचे नियोजन तयार करून झालेल्या घटकाच्या अभ्यासक्रमावर प्रत्येक महिन्याच्या शेवटी फक्त एक चाचणी परीक्षा आयोजित करावी. जेणेकरून वर्गशिक्षकाला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून केलेल्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन, विश्लेषण व अनुधावन करता येईल.

माझ्या वैयक्तिक मतानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कमी लागण्याची वरील सर्व संभाव्य कारणे आहेत तसेच उपाययोजना सुद्धा सर्वच ठिकाणी लागू होऊ शकतील असे नाही परंतु स्थळ, वेळ, काळ, यानुसार आवश्यक बदल करून जर आपण आपल्या शाळेत या परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले तर या परीक्षेत निश्चितच यश मिळेल आणि आपल्या महाराष्ट्राचा विद्यार्थी भविष्यकाळातील एमपीएससी किंवा युपीएससी अश्या स्पर्धापरीक्षेत नावलौकिक मिळवतील यात तिळमात्र शंका नाही.

(श्री. रविंद्र बाबासाहेब पागीरे (M.A.B.Ed.) हे जि. प. प्राथमिक शाळा, सौंदाळा,
ता. नेवासा, जि. अहमदनगर
येथे उपाध्यापक आहेत)