राजकिरण चव्हाण, सोलापूर, मो. 7774883388

कोरोनाच्या या संकटामध्ये मुलांना सध्या ऑनलाईन पद्धतीनं शिकवणं सुरू आहे. शिकवलेलं या मुलांना कितपत समजलं हे जाणून घेण्यासाठी त्यांचं मूल्यमापन करणं, त्यांची एखादी चाचणी, एखादी परीक्षा घेणं हा एक शिक्षणाचा भाग आहे. कारण मूल्यमापन केल्यावरच एखाद्या मुलाला किती येतं? एखाद्या मुलास किती समजलं? याचा आपल्याला अंदाज बांधता येतो आणि या वरुन पुढं कसं शिकवायचं? कोणत्या गोष्टींकडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे? कोणत्या गोष्टीमध्ये कमतरता जाणवते? कोणत्या गोष्टी त्या मुलांना चांगल्या पद्धतीनं कळालेल्या आहेत? 

अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपणास मूल्यमापनाच्या माध्यमातून मिळू शकतील. तोंडीकाम, प्रात्यक्षिक, गृहपाठ, स्वाध्याय, वर्गकार्य, लेखी चाचणी आदी पर्याय उपलब्ध असले तरी या सध्याच्या काळामध्ये मूल्यमापनासाठी ‘ई-परीक्षा’ हा पर्याय आपल्याला समोर येतो. अर्थात आपल्या सर्वांना त्याच्या नावावरून लक्षात आलंच असेल की, ई-परीक्षा म्हणजे अशी परीक्षा जी मुलांना प्रत्यक्ष एखाद्या वर्गामध्ये बसून, सरांच्या समोर द्यायची नाहीये तर त्यांच्या हातामध्ये असलेला एखादा मोबाईल, टॅब्लेट. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून द्यायची आहे.

 ई परीक्षा अर्थात ‘इलेक्ट्रॉनिक परीक्षा’! या विषयाचे आपल्याला दोन भागांमध्ये लेख तयार करावे लागतील. पहिला भाग म्हणजे ऑनलाईन ई परीक्षा आणि ऑफलाईन ई परीक्षा. या भागामध्ये आपण ऑनलाईन ई परीक्षा संबंधी माहिती पाहणार आहोत. यासाठी आपण काही पर्याय निवडू शकतो ज्या माध्यमातून आपण मुलांच्या परीक्षा घेऊ शकतो. त्यामध्ये गुगल फॉर्म, कहूट अॅप, टेस्ट मोज डॉट कॉम आधी पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. आज अनेक शिक्षक बांधव वरील पर्यायांचा उपयोग करून मुलांची ऑनलाईन ही परीक्षा घेत आहेत.  गुगल फॉर्ममध्ये ‘क्विजेस’चा पर्याय निवडून त्याची टेस्ट, चाचणी तयार करू शकतो आणि या टेस्टची लिंक आपण मुलांना शेअर करु शकतो. ज्या माध्यमातून मुलांना स्क्रीनवर दिसणारे प्रश्न सोडवता येतील. त्यांचे कोणते प्रश्न बरोबर आले कोणते चुकले हेही कळेल आणि त्यांना चाचणीमध्ये किती पैकी किती गुण प्राप्त झाले हेही त्यांच्या स्क्रीनवर पाहता येईल. त्याचबरोबर टेस्ट मोज डॉट कॉम याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं मुलांची परीक्षा घेता येईल. यासोबतच कहूट अॅप्लिकेशनची टेस्ट संदर्भातील एक आयडी मुलांना शेअर करुन संबंधित टेस्ट अर्थात परीक्षा घेता येते. टेस्ट सोडवण्यासाठी मुलांना किती वेळ लागला हे समजू शकते. पण यामध्ये मी आपल्याला सर्वात सर्वात सोपा परंतु सर्वात उपयोगी असा पर्याय सुचवतो तो म्हणजे गुगल फॉर्म. कारण गुगल फॉर्म च्या माध्यमातून सोडवलेल्या परीक्षेचं संकलन गुगल ड्राईव्ह ते एका वर्कशीट मध्ये जमा केलं जातं. ज्याचा उपयोग करून मुलांच्या एकंदरीत अभ्यासाचं आपल्याला विश्लेषण करणं, त्यांचं पालक-शाळाप्रमुखांच्या समोर किंवा अन्य ठिकाणी सादरीकरण करणं सोयीचं होतं आणि एका अर्थानं आपण मुलांचं डॉक्युमेंटेशन करण्याचं कामसुद्धा आपल्याकडून होतं. हे झाले ऑनलाइन पर्याय आता आपण पुढच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की, ई परीक्षामध्ये आपल्याला कोणकोणते ऑफलाईन पर्याय उपलब्ध आहेत? चला तर भेटूया पुढच्या लेखाच्या वेळी धन्यवाद! (क्रमशः)

ई परीक्षा कशी घ्यायची? यासाठी एका उपयुक्त व्हिडिओची लिंक

http://www.srujanshilshikshak.blogspot.in

(राजकिरण चव्हाण हे ‘सर फाउंडेशन’
सोलापूरचे जिल्हा समन्वयक आहेत.)