आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांच्या मते “शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामधला विद्यार्थी सदैव जीवंत असतो.”
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.
युनेस्कोचे घोषवाक्य आहे – ‘शिक्षकांबाबत निश्चित भूमिका घ्या’ (Take a stand for Teachers!) निश्चित भूमिका म्हणजे नेमके काय करावे? तर शिक्षकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि शिक्षकांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी द्यावी!
सद्या ‘समाजातील उच्च गुणवत्ताधारक तसेच बुद्धिमान विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशाकडे वळावे आणि या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवावी’, सक्षम आणि ध्येयनिष्ठ बुद्धिमान शिक्षकांशिवाय गुणवत्तायुक्त शिक्षण शक्य होणार नाही.
दुसरीकडे राज्यात गत पाच महिन्यापासून रोजंदारी, कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन बंद आहे. याबाबत कोणत्याही स्तरावर विचार होतांना दिसत नाही.
याप्रसंगावर पु. ल. देशपांडे यांची ‘एका मोर्चाची गोष्ट’ नावाची कथा आहे. त्यात पु. लं. लिहितात, “… आमची एकच विनंती. उपाशी ठेवून ‘गुरुजी’ वगैरे नका म्हणू…”

म्हणून शेवटी वाटते, ‘शिक्षक दिन’… की ‘शिक्षक दीन’