अंक वाचण्यासाठी वरील फोटो -मुखपृष्ठावर - वर क्लिक करावे ......
शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे आदर्श नागरिक घडणं, संकुचितपणा, स्वार्थीपणा नष्ट होणं, जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन, समाजाशी जोडलं जाणं, पर्यावरण समजणं, चांगले - वाईटाचे ज्ञान होणं, कष्ट करण्याची तयारी निर्माण होणं म्हणजेच खरं शिक्षण! हे सर्व म्हणजे शिक्षण असेल तर हे सर्व कुठं मिळतं आहे आपल्या मुलांना?
मुलं शिकण्यासाठी शाळेत जातात, शिकतात कारण ती या जगात नवी असतात. जग समजून घेण्यासाठी ते शाळेत जातात. खरं तर शिकण्यासाठी ना शिक्षेची गरज, ना बक्षिसाची. मुलांना त्यांचे कुतूहल शमविणारं शिक्षण पाहिजे असतं.
शिक्षण आनंददायी असावं, त्याचं ओझं वाटू नये, ते मुलांवर लादलं जाऊ नये, मुलांना आवडावं, त्यांचे कुतूहल जागृत व्हावं, भविष्यासाठी उपयोगी पडावं, जीवनाचा मार्ग सुकर करणारं शिक्षण हवं, कारण मानवाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. माणूस आणि पशु यांमधील अंतर ओळखायचं साधन म्हणजे शिक्षण होय.
आजकाल शिक्षण म्हणजे शाळेत जाणे, शिक्षकांचे शिकविणे, पुस्तके वाचणे, परीक्षा देणे, उत्तीर्ण होणे झाले शिक्षण! खरं तर शिक्षण म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत सुरु असणारी निरंतर प्रक्रिया आहे.
शिक्षण ही एक अशी संपत्ती आहे, जी कोणी चोरु शकत नाही, जी दुसऱ्याला दिल्यावर कमी होत नाही तर तिच्यात वाढच होते आणि शिक्षण ही अशी भेट आहे जी देणाराही परत घेऊ शकत नाही.
स्वत:ला घडविण्यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा पण शिक्षणात काय साधन आहे आणि काय साध्य आहे या गोंधळात आज शिक्षणाचे 'ध्येय' हरवले आहे.
ज्ञानाचे भांडार, विश्वास, सदाचार, पावित्र्य, सुख, आनंद आदि सगळ्या शब्दांचा पर्याय आहे 'शिक्षक'. शिक्षकाचे खरे भांडवल असते नैतिकता आणि चारित्र्य. हे ज्याच्याकडे आहे अशा शिक्षकाचे जीवन नक्कीच सार्थ आणि धन्य होते.
शेवटी, जर शिक्षणाने आपल्याला एवढेही समजले नाही तर शिक्षण हवे कशासाठी?...